
महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला आहे. मुंबई वगळता राज्यातील इतर महानगरपालिकेतील काहीच ठिकाणं वगळता महायुती जवळपास संपुष्टात आली. नागपुरात तर भाजपने स्वबळाची तयारी पूर्ण केली आहे. ३८ प्रभागांतील इच्छुकांच्या मुलाखतीही सुरू केल्या असून, यादीही तयार केली जात आहे. तरीदेखील, घटक पक्ष असलेला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षा आहे. मात्र, सूत्रानुसार बैठकीची केवळ औपचारिकताच उरल्याची चर्चा आहे.

भाजपने नागपुरात आधीपासूनच स्वबळाचा नारा दिला. पक्षाचे शहरात बळकट संघटन आहे. शिवाय, 15 वर्षे मनपात सत्ता होती. पक्षाकडे सर्व ३८ प्रभागासाठी तगडे उमेदवारही आहेत. त्यामुळे भाजप महायुतीतील इतर घटक पक्षांना सोबत घेण्याची शक्यता कमीच आहे. फुटीनंतरच्या सध्याच्या शिंदे सेनेचे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकही नगरसेवक नाहीत. त्यामुळे भाजपने त्यांना एकही जागा न देण्याची मानसिकता तयार केल्याची माहिती आहे. केवळ चर्चा करू, असे सांगून त्यांना प्रतीक्षेत ठेवून वेळ मारून नेतील, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे राज्य प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनीही स्वबळाचे संकेत दिले. शिवसेनेने गुरुवारी, शुक्रवारी चर्चेची शक्यता व्यक्त केली. पक्षाचे नेते आमदार कृपाल तुमाने व पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव हे शहराबाहेर असल्याने बुधवारी चर्चा झाली नव्हती. त्यांच्या उपस्थितीत भाजपचा प्रस्ताव आल्यावर चर्चा होईल. जिल्हाप्रमुख महानगर सूरज गोजे यांनी जागावाटप व उमेदवारीवर चर्चा होईल, अशी माहिती दिली. राष्ट्रवादी अजित पवार गटाची बुधवारी जिल्हा निरीक्षक व माजी आ. राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात पक्षाच्या शहर आघाडीने मागणी केलेल्या १५ टक्के जागा अर्थात २२ ते २३ जागांची यादी दिली. ही यादी व याबाबतचा प्रस्ताव पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठविला आहे.


