Latest Marathi News
Ganesh J GIF

माणिकराव कोकाटेंच्या जागी धनंजय मुंडे ? धनंजय मुंडे मंत्री होणार ?

राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकमधील सदनिका घोटाळा प्रकरण चांगलेच भोवले आहे. काल (17 डिसेंबर) त्यांच्याकडील क्रीडा खाते काढून ते अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. तर विरोधक माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. अशातच धनंजय मुंडे यांनी कालच (17 डिसेंबर) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या जागेवर धनंजय मुंडे येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठे विधान केले आहे.

माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा नाशिक प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावली होती. ही शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली. शिवाय त्यांना तत्काळ अटक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. हे आदेश नाशिक पोलिसांना आज (18 डिसेंबर) मिळाले आहेत. तत्पूर्वी कोकाटे यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. लीलावती रुग्णालयात दाखल असलेल्या कोकाटेंकडील खाती काढून त्याची जबाबदारी अजित पवारांकडे देण्यात आले आहेत. कृषीमंत्री असताना सभागृहात रम्मी खेळत असल्यामुळे त्यांचे कृषीखाते काढून क्रीडाखाते देण्यात आले होते. आता अटकेची टांगती तलवार असतानाही राजीनामा घेण्याऐवजी कोकाटेंची खाती काढून घेण्यात आली आहेत.

कोकाटेंना कधीही अटक होऊ शकते, याची चर्चा बुधवारी असतानाच अचानक धनंजय मुंडे यांचा अमित शहांना भेटल्याचा फोटो व्हायरल झाला आणि वेगळ्याच चर्चांना उधाण आले. आता कोकाटे यांना हटवून त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांची वर्णी लागेल, अशी चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे मुंडे यांचे मंत्रिपद गेल्यानंतर त्यांच्या जागी छगन भुजबळ यांना संधी मिळाली होती. आता कोकाटेंच्या जागी मुंडेंना संधी मिळेल, अशी जोरदार चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही मुंडे दिल्लीत आहेत, याची कल्पना नव्हती.

याबाबत सुनील तटकरे यांच्याकडे माध्यमांनी विचारणा केली असता, धनंजय मुंडे काल दिल्लीत अमित शहांना भेटले, हे खरं आहे. मात्र, याचा कोकाटेंच्या मंत्रिपद जाण्याच्या चर्चेशी काहीही संबंध नाही, असे तटकरे म्हणाले. शहा-मुंडे भेटीनंतर संध्याकाळी आपण धनंजय मुंडे यांच्याशी बोललो. तेव्हा मुंडेंनी महिनाभर आधीच शहांच्या भेटीची वेळ मागितली होती, असे सांितल्याचे तटकरेंनी स्पष्ट केले. तसेच कोकाटेंवरील कोर्टाचे आदेश आणि मुंडेंचे शहांना भेटणे हा योगायोग असल्याचेही स्पष्ट केले. धनंजय मुंडे यांनी साखर कारखाना आणि अन्य कामे यासाठी अमित शहांची वेळ मागितली होती, आणि त्यासाठीच शहांना भेटले होते, असे तटकरे म्हणाले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!