
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र लढणार; शरद पवार गटाने मागितल्या ‘इतक्या’ जागा
राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. पुण्याच्या राजकारणात एक मोठी आणि महत्त्वाची उलथापालथ पाहायला मिळत असून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या संदर्भात दोन्ही गटांची पहिली महत्त्वाची बैठक पार पडली असून, जागावाटपाचा प्राथमिक आकडाही आता समोर आला आहे.

विशेष म्हणजे, ही निवडणूक केवळ महाविकास आघाडी म्हणून नाही, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढण्याच्या तयारीला प्राधान्य दिले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती दिली. शिंदे यांच्या मते, अजित पवार यांची महाविकास आघाडीत सामील होण्याची सकारात्मक मानसिकता आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील जागावाटपाच्या चर्चेत शरद पवार गटाने ३० ते ४० पेक्षा जास्त जागांची मागणी केली आहे, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी २५ ते ३० जागांचा प्रस्ताव ठेवला आहे.

शशिकांत शिंदे यांनी पुढे स्पष्ट केले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी काँग्रेस, शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी अशा सर्व घटकांमध्ये एकत्रित चर्चा सुरू आहे. जागावाटपाचा तिढा सुटण्यासाठी काँग्रेससोबतही सविस्तर चर्चा होणार असून, सन्मानजनक जागावाटप झाल्यास महाविकास आघाडी अधिक मजबुतीने पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

२०१७ च्या निवडणुकीचा विचार करता, पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद वर्चस्व होते. त्यावेळी १६२ जागांपैकी भाजपने ९७ जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३९ जागांवर समाधान मानावे लागले होते. दुसरीकडे, पिंपरी-चिंचवडमध्येही १२८ जागांपैकी ७७ जागा जिंकून भाजपने सत्ता काबीज केली होती, तर राष्ट्रवादीला ३६ जागा मिळाल्या होत्या. आता बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास सत्ताधारी भाजपला मोठे आव्हान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

