Latest Marathi News
Ganesh J GIF

‘PSI माझ्या आईला रात्री फोन करायचा, ड्रायव्हर घरी यायचा’, 20 वर्षांच्या तरुणानं संपवलं आयुष्य..!

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे. सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि वाईट प्रवृत्तींना नियंत्रणात आणण्यासाठी” पोलीस याची शपथ घेत असतात. पण, महाराष्ट्र पोलीस दलाला शरमेनं मान खाली घालणारी घटना लातूरमध्ये घडली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या जाचाला कंटाळून एका २० वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येआधी या तरुणाने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडीओमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी इथं ही घटना घडली आहे. इम्रान खलील बेलुरे (वय २०) वर्ष असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. इम्रानने आत्महत्येआधी एक व्हिडीओ रेकॉर्ड करून औराद शहाजनी पोलीस ठाणाचे सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कथित मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या व्हिडीओमध्ये इम्रानने सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दूरपडे आणि त्यांचा वाहन चालक तानाजी टेळे यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.

इम्रान बेलुरे याने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ तयार करत सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दूरपडे आणि त्यांचा वाहन चालक तानाजी टेळे यांच्याकडून गेल्या एक वर्षांपासून त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. जुन्या एका प्रकरणाच्या चौकशीच्या नावाखाली वारंवार घराकडे येऊन घरातील महिलांना त्रास देणे, तसंच मध्यरात्री गाडीत बसवून कुठेही घेऊन जाणे, अशा प्रकारचा छळ होत असल्याचं इम्रानने व्हिडिओमध्ये नमूद केलं आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर इम्रान बेलुरे याने दीनदयाल मंगेशकर कॉलेज, औराद शहाजनी येथील झाडात गळफास घेऊन जीवन संपवलं. घटनेची माहिती समजताच नातेवाईकांसह ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत नातेवाईक आणि ग्रामस्थांनी औराद शहाजनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. जोपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून होत आहे.

“सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दूरपडे मला खूप त्रास देत होते. पण मी आता काय बोलू, आमच्या आई-वडिलांनी त्रास सहन केला. पण, मला आता त्रास सहन होत नाही. मी आता काय बोलू. मला ती चोरी करायची नव्हती. पण, अमजदच्या बेलसाठी केली. पण मला माहित नव्हतं की, असंही काही होईल माझ्यासोबत. म्हणून मी आता फाशी घेत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दूरपडे हे रात्री १२, १ वाजता माझ्या आईला फोन करत होते होते, जेवण बनवलं का, जेवली का, हा मुलगा त्रास देतोय का? मी गळफास यासाठी घेतोय, दुसरं काही नाही. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दूरपडे यांची चुकी आहे. त्यांचा ड्रायव्हर तानाजी टेळे यानेही खूप त्रास दिला, तो रोज रात्री राऊंडला यायचा, माझ्यावर खूप दबाव टाकायला. आता खत्म!” -इम्रान

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!