
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला चार महिने पूर्ण झाले असतानाही या प्रकरणातील तपासाबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर आता आमदार रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. तपासातील दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत रोहित पवार यांनी थेट सीआयडी (CID) कार्यालय गाठले आणि तिथे अनोखे आंदोलन केले.

हातात कुलूप घेऊन रोहित पवार CID कार्यालयात!

रोहित पवार यांनी चक्क हातात कुलूप घेऊन सीआयडी कार्यालयात प्रवेश केला. सीआयडीचा तपास संथ गतीने सुरू असल्याचा निषेध म्हणून त्यांनी हे कुलूप दाखवत प्रशासनाला जाब विचारला. रोहित पवारांच्या या अचानक आणि आक्रमक कृतीमुळे सीआयडी कार्यालय परिसरात काही काळ कमालीचा तणाव निर्माण झाला होता. या आंदोलनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

“४ महिने उलटले, सत्य बाहेर आलेच पाहिजे!”
आंदोलनादरम्यान आपली भूमिका मांडताना आमदार रोहित पवार म्हणाले, “अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या घटनेला चार महिने उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या प्रकरणाचे सत्य समोर आलेले नाही. सीआयडीचा तपास नेमका कुठपर्यंत पोहोचला? तपासात काय निष्पन्न झाले? याची संपूर्ण माहिती जनतेला मिळालीच पाहिजे.” तपास यंत्रणांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे लोकांमध्ये संशय निर्माण होत असल्याचेही त्यांनी सूचित केले.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; CID कडून मौन
रोहित पवार यांच्या या थेट आणि आंदोलनात्मक भूमिकेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे, या हायव्होल्टेज ड्रामानंतर सीआयडी (CID) अधिकाऱ्यांकडून मात्र अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.अजित पवार यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने पूर्ण करावा आणि सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आता या आंदोलनानंतर अधिक जोर धरू लागली आहे.

