
लिफ्टमध्ये कुत्रा चावला.. कुत्र्याच्या मालकिणी विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पुढ काय घडल..बातमी बघा
महाराष्ट्र खबर विशेष – लोकांचे प्राणीपक्ष्यांवरील प्रेम वाढत आहे. घरामध्ये हिंस्त्र कुत्रे पाळण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे आपल्या आजू बाजूच्या लोकांना धोका असला तरी त्यांचे या लोकांना काहीही सोयरसुतक नसते. त्यामुळे सध्या शहरात अनेक ठिकाणी कुत्र्यांवरुन वादावादी होताना दिसत आहे. मगरपट्टा रोडवरील सोसायटीत चक्क लिफ्टमधून कुत्र्याला नेत असताना त्याने एका महिलेला चावा घेऊन जखमी केले. याप्रकरणी हडपसरमधील सोसायटीतील एका ४४ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मनिषा सिंग वर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २० जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता सोसायटीच्या लिफ्टमध्ये घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनिषासिंग यांनी कुत्रा पाळला आहे. हा कुत्रा वेळोवेळी सोसायटीतील लोकांच्या अंगावर धावून जाऊन चावला आहे. त्याबाबत सोसायटीतील लोकांनी अनेक वेळा त्यांना कुत्रा कोणाला चावणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. फिर्यादी या सोसायटीच्या लिफ्टमधून खाली येत होत्या. यावेळी मनिषासिंग यांची मुलगी कुत्र्याला घेऊन लिफ्टने खाली येत होती. त्यावेळी छोट्याशा जागेतून कुत्र्याला घेऊन जाताना तो कोणाला चावू नये, म्हणून कोणतीही दक्षता घेतली नाही. त्यामुळे फिर्यादी यांच्या अंगावर कुत्रा धावून त्याने फिर्यादी यांच्या उजव्या हाताचा चावा घेऊन त्यांना जखमी केले. फिर्यादी यांनी जखमेवर उपचार केल्यानंतर आता त्यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार पाटील तपास करीत आहेत.