पुण्यातील प्रसिद्ध सारसबागेत नमाज पठण केल्याप्रकरणी पाच ते सहा अनोळखी मुस्लिम व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 5 मे 2022 रोजी सायंकाळी साडे सहा ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान सारसबाग उद्यानातील गणपती मंदिराच्या पाठीमागील बाजूस घडला आहे.याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संदीप भास्कर गोडसे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार आता अज्ञात मुस्लिम व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी 295(अ), 188, 143 , महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1) (ई) सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारसबाग हे पुण्यातील प्रसिद्ध उद्यान आहे. पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात असणाऱ्या या उद्यानात 5 मे रोजी पाच ते सहा अनोळखी मुस्लिम व्यक्तींनी प्रवेश केला. त्यानंतर सारस बागेतील गणपती मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या पत्र्याच्या शेड जवळील लॉन्सवर एकत्र येऊन नमाज पठण केले. त्यामुळे पालिकेच्या मुख्य उद्यान अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करुन गैर कायदेशीर मंडळी जमवून गैर कृत्य केले.इतर समाजाच्या भावना दुखून जातीय तेढ निर्माण करण्यासाठी नमाज पठण केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदे पुढील तपास करीत आहेत.