
तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला निगडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाने लोखंडी कोयत्यासह अटक केली.ही कारवाई शुक्रवारी (दि.5) सकाळी साडे अकराच्या सुमारास ओटास्किम येथील येथील स्मशानभुमी जवळ केली आहे.
आदित्य किशोर बावीस्कर (वय – 22 रा. ओटास्किम निगडी) याच्यावर आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलीस अंमलदार विनायक सुभाष मराठे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
निगडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाला तडीपार गुन्हेगार ओटास्किम येथील स्मशानभूमी जवळ थांबला असून त्याच्याकडे धारदार हत्यार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने त्याठिकाणी जाऊन आरोपी आदित्य बावीस्कर याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दीडशे रुपयांचा लोखंडी कोयता आढळून आला.
आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याला पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 यांनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन तो विनापरवाना पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत वावरताना आढळून आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.