‘आमच्याकडे ज्याची बायको नांदत नाही, तो पण माणूस येतो’
शिंदे गटातील 'या' मंत्र्याचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, वाद पेटणार?
जळगाव दि २९ (प्रतिनिधी) – ‘स्त्रीरोग तज्ज्ञ हे कधीच हातपाय बघत नाही. हातपाय बघणारे कधीच स्त्री रोगतज्ज्ञ होऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जळगावमधील एका कार्यक्रमांमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेणारे वक्तव्य केले आहे. गुलाबराव म्हणाले म्हणाले की, ‘लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर ओपीडी सुरू असते. माझी एक हजार जणांची ओपीडी होती. आठ ते दहा दोन तासांत काढतो. मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही. आम्ही जनरल फिजिशियन आहे. आमच्याकडे बायको नांदत नाही, तो पण माणूस येतो. डॉक्टरांचं डोकं एका फॅकल्टीचं असतं. मात्र, आमचं एकटं डोकं व आमच्या समोर बसलेल्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात. आम्ही ऐकणारे एकटे असतो. त्यांच्या समस्या ऐकूण त्यांचे काम करतो. एक माणूस गेल्यानंतर आम्ही ऐवढे फ्रेश असतो, जसं की पहिलाच माणूस आला आहे’, असाही दावा त्यांनी केला आहे.पाटील यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञांकडून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
गुलाबराव पाटील यांनी या अगोदर आपल्या मतदार संघातील रस्त्यांची तुलना हेमा मालीनीच्या गालाबरोबर केली होती. त्यावेळेही मोठा वाद झाला होता. तर शिवसेनेतील बंडखोरीनंतर उंदराची चिंधी म्हणत ठाकरे गटाला लक्ष्य केले होते. आता स्त्री रोग तज्ज्ञांवर वादग्रस्त विधान केल्याने राजकीय राळ उडण्याची शक्यता आहे.