
हातात तलवारी काठ्या घेऊन या कला केंद्रावर जमावाचा हल्ला
हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद, त्या डान्सरने तक्रार दिल्यामुळे केला हल्ला, ही तीन नावे समोर, राजकिय कनेक्शन?
जामखेड – राज्यातील कला केंद्र हे वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. मध्यंतरी एका माजी उपसरपंचाच्या आत्महत्येमुळे बार्शी तालुक्यातील कला केंद्र चर्चेत आले होते. आता अहिल्यानगरमधील जामखेड तालुक्यातील मोहा येथील रेणुका कलाकेंद्रावर तब्बल १७ जणांच्या जमावाने तलवार, कोयते घेऊन प्रवेश करत तोडफोड केली आहे.
रेणुका कलाकेंद्रात गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात १७ जणांच्या जमावाने तोंडाला रूमाल लावून तलवार, काठ्या, कोयते घेऊन आले. त्यांनी कलाकेंद्राच्या आवारातील दुचाकी व रिक्षा यांची तोडफोड केली. गेटवर असलेल्या किराणा दुकानाचे काऊंटर फोडून कलाकेंद्रात प्रवेश करून तेथील होम थिएटर व लोकांना बसण्यासाठी ठेवलेल्या ५० खुर्च्याची तोडफोड केली. सुमारे वीस मिनिटे असा प्रकार चालू होता. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तीन दिवसांपूर्वी रेणुका कलाकेंद्रावर आष्टी (जि. बीड) येथील तीन व जामखेड येथील एक जणांनी धुडगूस घातला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यावरून हा हल्ला झाल्याचा अंदाज आहे. कलाकेंद्रातील नृत्यकाम करणाऱ्या मुलींची छेडछाड केल्याबाबत पहिला गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी रात्री रेणुका कलाकेंद्रात तीन चारचाकी वाहनातून अनेक जण आले. १७ जण तोंडाला बांधून गाडीमधून खाली उतरून हातात काठ्या, तलवार, कोयते घेवून कलाकेंद्राचे आवारात लावलेले रिक्षा व तीन मोटार सायकल वाहनाची तोडफोड केली आहे, अशी तक्रार कला केंद्र चालक ज्योती पवार यांनी दिली आहे. रेणुका कलाकेंद्रात तोडफोड प्रकरणी शुभम लोखंडे, सतीश टकले, नागेश रेडेकर व अक्षय मोरे (चिंग्या) या आरोपींची नावे समोर आली आहेत. जमावाच्या भितीनी आम्ही कला केंद्राच्या एका रूममध्ये लपून बसलो. पोलीसांना फोन केला असता जमाव चारचाकी वाहनातून सौताडाच्या दिशेने पळून गेला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ज्योती पवार यांच्या फिर्यादीवरून धुडगूस घालणाऱ्या टारगटांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस कर्मचारी रवींद्र वाघ गुन्ह्याचा तपास करत आहे. दरम्यान, हे टारगट पुन्हा हल्ला करतील, अशी भीती कला केंद्रावर काम करणाऱ्या मुली-महिलांनी व्यक्त केली आहे.