
कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावगुंडांकडुन बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, हॉकी स्टिकने मारहाण, अजित पवार आणि पदाधिकारी यांच्या अडचणी वाढणार?
माढा – माढ्यातील कुर्डू येथील अवैध उत्खनन प्रकरण ताजे असताना आता गावकऱ्यांकडून कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून काही गावकऱ्यांच्या हातात उगारलेल्या बेसबॉल स्टीक दिसत आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माढा तालुका युवकचे अध्यक्ष बाबाराजे जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून कुर्डु गावातील प्रकरण राज्य पातळीवर आणले होते. आता त्याच बाबाराजेवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्याला गावातील गुंडांनी मारहाण केली आहे. पोलिसांनी व काही गावकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही काही गुंड या अधिकाऱ्यांना बेसबॉल स्टीकने मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे अवैध उत्खनन मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी कुर्डू गावातील एक व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे. पोलिस वेळेवर आले नसते तर तिथं मोठा अनर्थ अटळ होता, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. व्हिडीओचा आधार घेत कुंभार यांनी म्हटले आहे की, त्या दिवशी जे घडलं त्याचा व्हिडिओ पुरावा आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर व तणावपूर्ण होती. जर पोलिस वेळेवर आले नसते तर तिथं मोठा अनर्थ अटळ होता. मग अशा परिस्थितीत “पोलिसांची आवश्यकता नव्हती, काहीच घडलं नव्हतं” असं सांगणं म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासारखं आहे. हा प्रयत्न केवळ दिशाभूल करणारा नाही, तर वास्तव लपवण्याचाही घातकी डाव असल्याची टीका कुंभार यांनी केली होती. आता या घटनेनंतर पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
यापूर्वी कुर्डु गावात अवैध उत्खननाविरोधात कारवाई करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना खडसावले होते, तसेच कारवाई थांबवण्याचे निर्देश दिले होते. या घटनेनंतर राज्यात वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता महसूल अधिकाऱ्यांना मारहाण झाल्यानंतर राजकीय वाद आणखी तीव्र झाला आहे.