१०० रुपयांच्या वादातून एक भयंकर घटना समोर ! दोन कुटुंबात जोरदार हाणामारी ; महिलेचा मृत्यू, ७ जण जखमी
बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील वासुदेवपूर पोलीस स्टेशन परिसरात १०० रुपयांच्या वादातून एक भयंकर घटना घडली आहे. शेजाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणात कांचन देवी नावाच्या ४० वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली.या घटनेत सात जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून याबाबत माहिती घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण वासुदेवपूर पोलीस स्टेशन हद्दीतील टिकरामपूर गावचं आहे. कांचन देवी यांचा मुलगा सुमन कुमार याने दिलेल्या माहितीनुसार, गावातील नरेश महतो यांचा मुलगा प्रिन्स कुमार याच्यासोबत १०० रुपयांवरून सकाळी मोबाईलवर वाद आणि शिवीगाळ झाली. दोघांमध्ये भांडण झालं, त्यानंतर प्रकरण शांत झाले. यावरून सायंकाळी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की दोन्ही कुटुंबामध्ये जोरदार हाणामारी झाली. या मारामारीत लाठ्या-काठ्या, दगडांचा वापर करण्यात आला, यात कांचन देवी गंभीर जखमी झाल्या. कांचन देवी यांच्या कुटुंबातील अनेक जण जखमी झाले.कांचन यांचा मुलगा सोनू याने प्रिन्सकडून १०० रुपये उसने घेतले होते, ते परत केले नसल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. गुरुवारी सकाळी प्रिन्सने सोनूच्या मोठ्या भावाला फोन करून १०० रुपये मागितले. यावरून सुमन आणि प्रिन्समध्ये शिवीगाळ व भांडण झाले.
सायंकाळी उशिरा प्रिन्स, उमेश, राजन, विशाल कुमार, पंकज कुमार, अभिनाश कुमार, सत्यम कुमार, सनी कुमार, अंकित कुमार आणि रुची देवी यांनी शिवीगाळ सुरू केली. आरोपींनी घरात घुसून विटेने हल्ला केला. दरम्यान, वीट फेकली, ती कांचन देवी यांच्या अंगावर आदळल्याने मृत्यू झाला. या घटनेत बेचन महतो, नेपाल महतो, वकील महतो, सोनू कुमार, सुमन कुमार, दीपक देवी व अन्य एक महिला जखमी झाली आहे. घटनेनंतर वासुदेवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.