![Ganesh J GIF](https://maharashtrakhabar.com/wp-content/uploads/2022/08/gif-advt.gif)
हॉटेलमध्ये घुसून तरूणाला लाथा बुक्क्या आणि फाईटरने मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, गुन्हेगारीची मालिका सुरूच, या कारणामुळे बेदम मारहाण?
बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडमधील वाढती गुन्हेगारी चर्चेत आली होती. बीडचा बिहार झाल्याचा हल्लाबोल विरोधक करत होते. आता पुन्हा एकदा बीडमधील वाढती गुन्हेगारी अधोरेखित करणारी घटना घडली आहे. तसेच ती घटना सीसीटीव्हीत कैदही झाली आहे.
बीड शहरातील मोमिनपुरा भागात दिवसाढवळ्या एका तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.मोहम्मद खलील राशिद असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्ल्यात मोहम्मद खलील राशिद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तीन टाके पडले आहेत. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. नजीब खान उस्मान खान, खिजर खान शरीफ खान अशी हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहीतीनुसार, आरोपी आणि जखमी एकाच गल्लीत राहतात. काही दिवसांपूर्वी आरोपीने आपल्या घरासमोरील रस्त्यावर नालीतील घाण टाकली होती. या प्रकाराची तक्रार मोहम्मद खलील राशिद यांनी केली होती. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपींनी चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला केला. ही संपूर्ण घटना १९ जानेवारी २०२५ रोजी हॉटेल शालीमारमध्ये घडली होती. पण ती आता समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलीस ठाण्याने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आणि पुढील तपास सुरू आहे. पण बीड शहरात खुलेआम गुंडागर्दीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड शहरात खुलेआम गुंडाराज सुरू असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. काल वाल्मिकच्या बातम्या का पाहतो म्हणून संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेच्या ओळखीच्या तरूणाने एकाला मारहाण केली होती. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.