
पिंपरी – काही वर्षांच्या प्रेमसंबंधानंतरही लग्नास नकार दिल्याने १९ वर्षाच्या तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तरुणासह दोघांना अटक केली आहे.
सुबोध सुधीर साखरे (वय २५) आणि रोहन सुदाम पारखी (वय ३०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तर, सुधीर साखरे, सुबोध साखरे याची आई आणि एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कैलास मुरलीधर गायकवाड (वय ४०) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना फिर्यादीच्या राहत्या घरी शनिवारी दुपारी ४ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १९ वर्षाच्या मुलीचे सुबोध साखरे याच्याबरोबर मागील काही वर्षांपासून प्रेम संबंध होते. फिर्यादीच्या मुलीने त्यास लग्न कर असा तगादा लावला होता. परंतु सुबोध व त्याच्या नातेवाईकांनी लग्नास नकार देऊन काहीही झाले तरी लग्न लावून देणार नाही, असे बोलले. त्यामुळे फिर्यादींची मुलगी डिप्रेशनमध्ये आली. तिने मानसिक दडपणाखाली राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक झोल तपास करीत आहेत.