पुणे मनपा समोर आम आदमी पार्टीचे “कर वापसी आंदोलन”
सवलत रद्द करून वाढीव मिळकत कर घेताना घाई, परत देताना मात्र दिरंगाईचा ठपका
पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुणे महानगरपालिकेच्या भोंगळ्या मिळकत कर धोरणाचा आज आम आदमी पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या बाहेर “कर वापसी आंदोलन” करून निषेध व्यक्त करण्यात आला. आपचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कराच घोंगडं अजून भिजतच पडलेल आहे. स्वतः मिळकतीचा वापर करणाऱ्यांना मिळकत करात देण्यात येणारी ४०% सवलत आधी काढून घेण्यात आली आणि नागरिकांच्या प्रखर विरोधानंतर परत बहाल करण्यात आली. मात्र अजूनही ही सवलत कशा पद्धतीने द्यायची याच्या संदर्भात नेमकं कुणालाच काहीही कळत नाहीये. नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. आता पुणे महापालिकेने यासाठी एक फॉर्म जारी केलेला आहे आणि त्याच्याबरोबर ढीगभर कागदपत्रांची मागणी तसेच २५ रुपये फीची सुद्धा मागणी केलेली आहे. अगोदरच या महागाईच्या काळात सामान्य माणसाला या सरकारकडून गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु सामान्य नागरिकांच्या कष्टाचे पैसे टॅक्स रुपी घेऊन आता तो परत करण्यासाठी नागरिकांकडून वाढीव माहिती मागत आहेत. मुळात यात नागरिकांचा काहीही दोष नाही. पुणे शहरातील नागरिकांना १९६९ पासून असलेली मिळकत करातील सवलत राज्य शासनाने २०१९ पासून बंद केली होती. आता पुन्हा सुरु केली. पण हे करताना भारतीय जनता पक्ष आणि मनपा प्रशासन या दोघांनी मिळून केलेला घातलेला हा गोंधळ आहे. आता या गोंधळामुळे नागरिकांची फरपट फरफट होत आहे. अस्तित्वात असलेली सोपी मिळकत कर प्रणाली बदलून क्लिष्ट करण्याचा आणि अनेकांना मिळकत कराच्या सवलतीपासून वंचित ठेवण्याचा पुणे महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. असा आरोप आपने केल्या आहेत. यावेळी पक्षाने काही मागण्या पालिकेकडे सादर केल्या आहेत.
पुणे महानगरपालिका समोर झालेल्या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टीचे राज्य संघटक, पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, डॉ अभिजित मोरे, एकनाथ ढोले, किरण कद्रे, सेंथिल अय्यर, सुनीता काळे, वैशाली डोंगरेसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.