चारित्र्याच्या संशयावरुन प्रियसीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पळून गेलेल्या आरोपी प्रियकरास सोलापूरमधून पोलिसांनी अटक केली. वाकड पोलिसांनी ही कामगिरी केली. शिवानी सोमनाथ सुपेकर (वय २८) असे खून झालेल्या प्रियसी तरुणीचे नाव आहे. विनायक अनिल आवळे (वय ३५) असे अटक केलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास जगतापनगर, थेरगाव येथे रिक्षामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी महिलेची ओळख पटवली. सध्या शिवानी या रिक्षा चालक आरोपी विनायक याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे समजले. घटनेनंतर तिचा प्रियकर विनायक हा पळून गेल्याचे निष्पन्न झाले. आरोपी विनायक याचा शोध घेण्यासाठी वाकड पोलिसांनी दोन पथके तयार केली. आरोपी विनायक हा विजापुर, कर्नाटक येथे पळून गेल्याचे खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. वरिष्ठांचे परवाणगीने तात्काळ आरोपीचा शोध घेणेबाबत तपास पथकातील पोउपनि. सचिन चव्हाण व अंमलदार यांचे तपास पथक रवाना केले. आरोपी हा विजापुर येथून परत सोलापुरच्या दिशेने प्रवास करीत असताना तपास पथकाने पाठलाग करुन त्यास सोलापुर रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले.
आरोपी विनायक याला शिवानी यांच्या चारित्र्यावर संशय आल्याने तिचा त्याचे राहते घरामध्ये गळा आवळून खून केल्याची कबुली त्याने दिली. आरोपी विनायक आवळे हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशीकांत महानवर, अपर आयुक्त, वसंत परदेशी, उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक आयुक्त, सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, गोरख कुंभार, सहायक निरीक्षक अर्जुन पवार, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, अनिरुध्द सावर्डे, विभीषण कन्हेरकर, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदु गिरे, संदिप गवारी, स्वप्निल खेतले, प्रमोद कदम, अतिश जाधव, अतिक शेख, प्रशांत गिलबिले, रामचंद्र तळपे, अजय फल्ले, सौदागर लामतुरे, भास्कर भारती, प्रशांत गिलबिले, रमेश खेडकर, ज्ञानदेव झेंडे, सागर कोतवाल, मंगेश लोखंडे यांच्या पथकाने केली आहे.