उत्पन्नाचा दाखला व डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी लाच मागणाऱ्या महा ई सेवा केंद्राचालकासह कॉम्प्युटर ऑपरेटर महिला एसीबीच्या जाळ्यात
तहसिल कार्यालयात ओळख असल्याचे सांगून उत्पन्नाचा दाखला व डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी ५ हजार रुपयांची लाच मागणार्या व अडीच हजार रुपये घेताना महा ई सेवा केंद्रचालक व कॉम्प्युटर ऑपरेटर महिलेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. संतोष बबन वाळके (वय ४८) आणि नंदा राजू शिवरकर (वय ३६) अशी कारवाई केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत एका ५४ वर्षाच्या नागरिकाने तक्रार केली होती.
तक्रारदार हे उत्पन्नाचा दाखला व डोमिसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी दिघी येथील गुरुदेव दत्त महा ई सेवा केंद्रात गेले होते. संतोष वाळके व नंदा शिवरकर यांनी तक्रारदार यांना आमची तहसिल कार्यालयात ओळख आहे. ही कामे करुन देण्यासाठी त्यांच्याकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी केली. त्यात त्यांनी ही कामे करुन देण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त ५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर दिघी येथील गुरुदेव दत्त महा ई सेवा केंद्र येथे सापळा रचण्यात आला.
तक्रारदार यांच्याकडून अडीच हजार रुपये घेताना नंदा शिवरकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक विरनाथ माने तपास करीत आहेत.