(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) – चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत असताना मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना एका आरोपीचा मृत्यु झाला. सचिन अशोक गायकवाड (वय ४७) असे मृत्यु पावलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, पर्वती पोलीस ठाण्यातील पोलिसांनी सचिन अशोक गायकवाड आणि मनोहर रमेश माने (वय ३६) यांना चोरीच्या गुन्ह्यात ७ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता अटक केली होती. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना विश्रामबाग पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. दुसर्या दिवशी त्यांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. दोघांना विश्रामबाग पोलीस कोठडीत ठेवण्यात आले.
तेथे ९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सचिन गायकवाड याला चक्कर आल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे रुग्णवाहिकेतून त्याला तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे आयसीयूमध्ये दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. मेंदूत रक्तत्राव झाल्याने त्याला हा त्रास होत असल्याचे आढळून आल्यानंतर त्याच्यावर साडेबारा वाजता शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला हा त्रास पूर्वीपासून होता. त्याची नातेवाईकांना माहिती होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली होती. ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता त्याचा मृत्यु झाला. आरोपीचा कोठडीत असताना मृत्यु झाल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.