
गुंड गजा मारणे टोळीच्या आरोपींची पुणे पोलीसंनी काढली धिंड
धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल, गजा मारणे टोळीविरोधात मोक्काची कारवाई, पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
पुणे – पुणे शहरातील गज्या मारणे गँगकडून पुण्यातील भाजप नेते व केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर मंत्री मोहोळ यांनी पुणे पोलिसांनी चांगलच फैलावर घेतल होते. त्यानंतर पोलीसांकडुन कारवाई करण्यात आली आहे.
पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये बुधवारी शिवजयंती दिवशी दुचाकीस्वार अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला कुख्यात गुंड गज्या मारणेच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना समोर आली होती. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना वाद झाला आणि देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुणाच्या नाकाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आत्तापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतले होते. तर एकजण फरार आहे. ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू , किरण कोंडिबा पडवळ, आणि अमोल विनायक तापकीर अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी या आरोपींना धडा शिकवत त्यांची धिंड काढली आहे. या तिन्ही तिन्ही आरोपींना पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. गुंडांची दहशत कमी करण्याच्या उद्देशाने व आरोपींना जरब बसावा म्हणून पोलिसांनी ही धिंड काढली. हाताला बेड्या आणि तोंडाला काळ कापड घालून पोलिसांनी तिघांनाही शहरातून फिरवले आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. तसेच या टोळीविरोधात आता मोक्का लावण्यात आला आहे. सुशिक्षित तरुणाला विनाकारण मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्यांना सोडू नका. एवढेच काय, तर त्यांना वाचविण्यासाठी येणाऱ्यांच्या विराेधातदेखील कडक कारवाई करावी, असे आदेशही माेहाेळ यांनी दिले आहेत.
पुण्यातून टोळीला संपवण्याची पोलिसांची भूमिका आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नका, त्या टोळीतील सदस्यांची मालमत्तांची माहिती डीडीआर केली जाणार आहे, तर त्यांच्या वाहनांची माहिती देखील आरटीओकडून मागवण्यात आल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.