
शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराविरोधात अभिनेत्रीची तक्रार
आमदारावर केले धक्कादायक आरोप, पोलीसांनी सहकार्य न केल्याचा आरोप, शिंदेंचा आमदार गोत्यात
रायगड – शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात अभिनेत्री हेमांगी राव हिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या अभिनेत्रीने केलेल्या आरोपामुळे राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच थोरवे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वामध्ये विविध भूमिका साकारणाऱ्या हेमांगी रावने खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कर्जतमधील शिवसेनेचे आमदार थोरवे आणि नवी मुंबईतील एका व्यावसायिकाविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. भूखंड मिळवण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. अभिनेत्री हेमांगी राव आणि त्यांचा नवरा डॉक्टर विनोद राव यांनी जमीन घेतली आहे. जुन्या मुंबई – पुणे महामार्गाजवळ खालापूर तालुक्यातील कांडरोली गावात त्यांची जमीन आहे. नवी मुंबईतील विकासक दिपक वाधवा यांनी या जमिनीचा व्यवहार केला होता. मात्र काही कारणामुळे या व्यवहाराचं काम पूर्ण झालं नाही. मात्र वाधवा यांनी दादागिरी करत बळजबरीने जमीन हस्तगत केल्याचा आरोप राव यांनी केला आहे. जमीन बळकावण्यासाठी वाधवा यांना आमदार थोरवे मदत करत असल्याचंही राव यांनी म्हटलं आहे. धमकावल्याची तक्रार हेमांगी राव यांनी पोलिसांकडे केली आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांकडे ४ वेळा तक्रार करुनही पोलीस या प्रकरणाची दखल घेत नसल्याचं राव यांनी सांगितले आहे.
याप्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली असल्याचे देखील अभिनेत्रीने सांगितले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचे आमदारही अडचणीत आले आहेत.