
आणि भाजप आमदार पडले पुराच्या पाण्यात पण….
आमदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, गनमॅन वाहून जाता जाता वाचला, जवानांचे होतेय कौतुक
बागेश्वर – उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यात कापकोट परिसरातील ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. रात्री उशिरा झालेल्या ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. गावातील अनेक घरांमध्ये मातीचे ढिगारे घुसले, ज्यामुळे मोठे नुकसान झाले. याचा फटका पाहणी करण्यासाठी आलेल्या एका भाजप आमदाराला बसला आहे.
कपकोटचे आमदार सुरेश गढिया हे आपत्तीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना घटनास्थळी पोहोचण्यात मोठ्या अडचणी आल्या. पौंसरी गाव आणि घटनास्थळादरम्यान वाहणाऱ्या ओढ्याचा प्रवाह खूप जास्त होता. एसडीआरएफच्या जवानांनी रशीच्या सहाय्याने आमदार सुरेश गढिया यांना ओढ्यातून दुसऱ्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. मात्र या वेळी पाण्याचा प्रवाह इतका वेगात होता की गढिया यांचा पाय अडखळला आणि त्यांचा तोल गेल्याने ते खाली पडू लागले. त्यामुळे त्यांचा गनमॅन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र याच प्रयत्नात गनमॅन जोरदार प्रवाहात वाहून गेला. एसडीआरएफच्या जवानांनी तात्काळ कारवाई करत गनमॅनला सुरक्षितपणे वाचवले. गावकऱ्यांच्या मदतीने आणि जवानांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. गनमॅन बराच दूरपर्यंत वाहून गेला होता. जर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी लगेच हालचाल केली नसती तर त्याला जीव गमवावा लागला असता. दरम्यान या घटनेत आमदाराचा मोबाईल फोन आणि गनमॅनची कार्बाइन बंदूक जोरदार प्रवाहात वाहून गेली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरस झाला आहे. अनेकांनी जवानांनी दाखवलेल्या धैर्याचे विशेष कौतुक केले आहे.
गेल्या काही दिवसांत हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, उत्तराखंड, राजस्थान, दिल्ली, प्रयागराज आणि मध्य प्रदेशसह अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलनच्या घटना घडल्या आहेत., हवामान विभगाने देशाच्या अनेक भागांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला असून, हिमाचल, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट आहे.