नागपूर दि १७ (प्रतिनिधी)- राज्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. त्यामुळे अपघातांचेही प्रमाण मोठे आहे. अलीकडे मेटे आणि मिस्त्री यांना सुद्धा रस्ते अपघातात आपला जीव गमावावा लागला. यामुळेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांना रस्ते अपघातात पुढचा नंबर आमचा आहे का? अशी विचारणा करणारे पत्र लिहिण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
यवतमाळ-अमरावती रस्त्यावर खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढलं आहे. या मार्गाने प्रवास करणं म्हणजे मृत्यूच्या सापळ्यात अडकण्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे या मार्गावरील तब्बल ३४ शाळांमधील मुलांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अपघातात पुढचा नंबर आमचा तर नाही ना? अशी भीती व्यक्त करत या शाळांमधील ८ हजार विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भावनिक पत्र लिहित या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले आहे. तीन राज्यांना जोडणाऱ्या यवतमाळ-अमरावती मार्गावरील ३४ शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे हा मार्ग पूर्ण होऊ शकलेला नाही. याआधी काही अपघातात शाळकरी मुलांना आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे हा पत्रप्रपंच करण्यात आला आहे.
नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील सावरकर नगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या पत्त्यावर पत्र पाठवलं आहे. यामधे विद्यार्थ्यांनी खड्डेमय रस्त्यावर दररोज प्रवास करताना होणार त्रास सांगण्यात आला आहे. त्यामुळे व्हिजनची गोष्ट करणारे गडकरी या मुलांच्या व्यथा एैकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.