पिंपरी – हॉटेलमध्ये जेवण करुन बील देताना एकाने पत्नीच्या अंगावर कागदाची चिठ्ठी फेकल्याने वाद झाला. त्यावरुन हॉटेलच्या मालकाने साई अमृत लॉज येथे बोलावून घेतले. तेथे बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा उपचार सुरु असताना मृत्यु झाला़ पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन पाच जणांना अटक केली आहे. संकेत गावडे असे मृत्यु पावलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी दीपक मधुकर जाधव, दीपक सुभाष सोनवणे, तेजस सोपान गाढवे, अक्षय मारुती पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बंटी आणि गोल्या अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जयदीप हॉटेल व महांळुगे येथील साई अमृत हॉटेल येथे १९ ऑगस्ट रात्री पावणे आठ ते २० ऑगस्ट पहाटे अडीच वाजण्याच्या दरम्यान घडला. याबाबत चैत्राली संकेत गावडे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्याचे पती संकेत गावडे व मुलांसह जेवणाकरीता जयदीप हॉटेलमध्ये गेले होते. संकेत गावडे हे बील भरत असताना दीपक सोनवणे याने फिर्यादीच्या अंगावर कागदाची चिठ्ठी फेकली, ते पतीने पाहिल्यावर त्या चिठ्ठीवरुन वाद झाला. तेव्हा सोनवणे याने संकेत याच्या कनपटीत चापट लगावली. त्या कारणावरुन हॉटेलचे मालक यांनी संकेत यांना फोन करुन मी साई अमृत लॉज चामेन शेठ बोलतो. तुमचा काय विषय झाला आहे. तो मिटवू, तु साई अमृत लॉज महाळुंगे येथे ये असे बोलल्याने फिर्यादी, संकेत व मुले लॉजवर गेले. तेथे झालेल्या वादात पाच जणांनी लाकडी दांडक्याने व लाथाबुक्याने बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली. फिर्यादी पतीला सोडविण्यासाठी गेल्या असताना त्यांच्या कानपटीत चापट मारली. संकेत गावडे यांना हॉस्पिटलमध्ये नेले. उपचार सुरु असताना पहाटे त्यांचा मृत्यु झाला. अंत्यसंस्कार केल्यानंतर काल फिर्याद दिली. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.