स्कुल बस धुण्यावरुन झालेल्या वादात टोळक्याने चालकावर तलवार, कोयत्याने वार करुन जखमी केले. तसेच त्याच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनीदोघां वर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.ऋषिकेश ऊर्फ मोन्या वाघेरे (वय २५) आणि अर्थव बाळासाहेब गुंड (वय १९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.या घटनेत सोमनाथ अशोक कापसे (वय ४५) हे जबर जखमी झाले असून वाय सी एम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची फिर्याद घेतली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे स्कुल बसचे चालक आहेत. ते पिंपरी गावाच्या स्मशानभूमीसमोर स्कुल बस धूत होते. यावेळी त्यांच्या घरासमोर राहणारा अर्थव गुंड हा त्या ठिकाणी आला व म्हणाला, “तू या ठिकाणी गाडी धुवु नको,” त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला “का धुवू नको,” असे विचारले़ त्यावर त्याने शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांनी प्रतिकार करताच त्याने आपला मेव्हणा ऋषिकेश ऊर्फ मोन्या वाघेरे याला बोलावून घेतले. मोन्या सफारी गाडीतून ४ ते ५ जणांना घेऊन आला. त्यांच्या हातात तलवारी, कोयते होते. त्याने फिर्यादीला तू माझ्या मेव्हुण्याशी का भांडण केले. “आता तुला जिवंत ठेवत नाही. तुला ठार मारुन तुझा खेळ खल्लास करतो,” असे म्हणून हातातील तलवार फिर्यादीच्या डोक्यात मारली. तो वार फिर्यादीने चुकविला. तलवार त्यांच्या डोक्याला उजव्या बाजूस घासून गेली. त्यानंतर फिर्यादी पळून जात असताना अर्थव व इतरांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यापैकी काही जणांनी दगड फेकून मारला.
अर्थव याने हातातील कोयत्याने त्यांच्यावर वार केला. फिर्यादी यांनी तोही वार चुकविला. त्यानंतर मोन्या याने व इतरांनी हातात तलवार व कोयते घेऊन हवेत फिरवून “आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागायचे नाही. नाही तर एकेकाला बघून घेतो,” असे म्हणून मोठमोठ्याने आरडाओरडा करत दहशत निर्माण केली. भांडणे सोडविण्यासाठी आलेले चुलत भाऊ नितीन कापसे, दिगंबर शिंदे, फिर्यादी यांची पत्नी छाया कापसे यांनाही त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर ते सर्व सफारीतून पळून गेले. जाताना फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी हे बाजूला झाले. गाडीचा धक्का लागून ते खाली पडले. त्यावेळी त्यांची मुलगी फिर्यादीकडे पळत येत असताना तिच्याही अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस निरीक्षक धनंजय कापरे तपास करीत आहेत.