
तनिष्कच्या शोरूममध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा
वीस मिनिटात लुटले २५ कोटींचे दागिने, दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद, लोकांना ओलीस ठेवत दरोडा
बिहार – बिहारमधील आरा येथे दिवसाढवळ्या तनिष्क या सोन्याच्या शोरुमवर दरोडा टाकण्यात आला आहे. यावेळी दरोडेखोरांनी २० मिनिटांत २५ कोटी रुपयांच्या दागिन्यांची लूट केली आहे. दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
बिहारमध्ये दिवसाढवळ्या दरोडा टाकत दरोडेखोरांनी तनिष्क ज्वेलर्समध्ये प्रवेश करत लाखो रुपयांचे दागीणे आणि रोख रक्कम लंपास केली आहे. आरा येथील तनिष्क ज्वेलरी शोरूममध्ये सोमवारी दिवसाढवळ्या चोरट्यांनी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळच्या सुमारास हा दरोडा पडला आणि घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, तोंडाला मास्क घातलेले काही जण शोरूममध्ये घुसले आणि ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना हात वर करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी सर्वांना धमकावून सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने बॅगेत भरुन पळ काढला. सुरुवातीला दोन दरोडेखोर १०.२० वाजता आत शिरले आणि त्यानंतर १० मिनिटांनी १०.३० वाजता अचानक चार दरोडेखोर शोरूममध्ये घुसले. यावेळी त्यांनी गार्डला मारहाण केली आणि त्याचे शस्त्रही हिसकावून घेतले. त्यानंतर शोरूममध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आतून शटर बंद केले आणि सुमारे २२ मिनिटे लुटमार केली आणि लुटमार करून १०.५० वाजता पळून गेले. या घटनेबाबत शोरूमचे स्टोअर मॅनेजर कुमार मृत्युंजय म्हणाले, ‘त्यावेळी या तनिष्क शोरूममध्ये ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने होते, गुन्हेगारांनी २५ कोटी रुपयांचे दागिने लुटले आहेत. दरोड्यानंतर भोजपूरच्या एसपीसह पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला आहे. पण सध्या सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सहा दरोडेखोरांपैकी दोघांना पकडण्यात आले आणि चार दरोडेखोर लुटलेले दागिने घेऊन पळून गेले, त्यांचा शोध सुरू आहे. भोजपूरचे एसपी राज म्हणाले की, तनिष्क शोरूममधून लुटलेले दागिने, दोन पिस्तूल, १० काडतुसे आणि दोन मोठ्या बॅगा गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आल्या आहेत.