वसमत तालुक्यातील तेलगाव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तसेच नापीकीमुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असलेल्या तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात सोमवारी ता. ९ अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. रामेश्वर पंडीतराव कानोडे ( २२) असे तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलगाव येथील रामेश्वर यांना त्यांच्या वडिलांच्या नावे चार एकर शेती आहे. या शेतीवर त्यांनी एका खाजगी बँकेचे ४ लाख रुपये व एका राष्ट्रीयकृत बँकेचे २.५0 लाख रुपये कर्ज घेतले होते. मागील काही वर्षात सतत होणाऱ्या नापीकीमुळे कर्ज कसे फेडावे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला होता.
या शिवाय त्यांनी दोन वेळेस पोलिस दलात भरती होण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आरक्षण नसल्यामुळे त्यांना नोकरी मिळू शकली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतल होता. तर जिल्हयात मराठा आरक्षणासाठी झालेल्या सभा, बैठकांमधून त्यांनी स्वयंसेवक म्हणूनही काम केले आहे.