
पिंपरी- उसने दिलेले पैसे परत का मागितले तसेच चिंचवड येथील एस आर ए स्किममध्ये आडकाठी आणल्याच्या कारणावरुन दोघांनी तरुणावर कोयत्याने सपासप वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी निगडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तेजस ऊर्फ बबलु दिंगबर शिंदे (वय २९) दीपक राम मोरे (वय ४८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत नागेश बाबु राठोड (वय ३८) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना चिंचवडमधील संभाजीनगर येथील साई उद्यानाजवळ शनिवारी रात्री पावणे दहा वाजता घडली. फिर्यादी याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच वस्तीत राहतात. ते रहात असलेल्या इंदिरानगर येथील एस आर ए स्किम सुरु आहे. त्यामध्ये दीपक मोरे याच्या बहिणीला घर मिळण्यास फिर्यादी हे आडकाठी आणत असल्याचा आरोपींचा समज झाला.
तसेच फिर्यादी यांनी आरोपीला उसने पैसे दिले होते. साई उद्यानाजवळ फिर्यादीला आरोपी भेटले तेव्हा फिर्यादीने उसने पैसे परत मागितले. हे कारण तसेच एस आर ए स्किममध्ये आडकाठी आणत असल्याच्या रागातून मोरे याने फिर्यादीस पकडून ठेवले. तेजस शिंदे याने त्याच्याजवळील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात सपासप वार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी यांनी डोक्यावर हात ठेवल्याने त्यांचे मनगटाजवळ व तीन वार पाठीवर करण्यात आले. त्यात राठोड हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर दोघांनी हातामधील कोयते हवेमध्ये फिरवून जमलेल्या लोकांमध्ये दहशत निर्माण केली. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.