तोतया व्यक्ती उभी करुन माजी सैनिकाची शासनाने दिलेली जमीन हाडपण्याचा प्रयत्न ; ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
त्याच नावाची तोतया व्यक्ती उभी करुन माजी सैनिकाची शासनाने दिलेली जमीन साठे खत करुन हाडपण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बाळासाहेब रामचंद्र निंबाळकर यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तोतया बाळासाहेब रामचंद्र निंबाळकर, अशोक केरभाऊ भोरडे , दादा रमेश जाधव व इतर ५ ते ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सेवानिवृत्त सैनिक असून मौजे मुर्टी येथील सिलिंग जमीन वाटपअन्वये शासनाकडून १ हेक्टर १८ आर जमीन मिळाली आहे. ७/१२ वर त्यांच्या नावाने नोंद आहे. महादेव कुंभार यांनाही त्यात गटात जमीन मिळाली आहे. ८ ऑगस्ट २०२४ रोजी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कोतवाल तानाजी खोमणे हे फिर्यादींना भेटले. तेव्हा त्यांना समजले की त्यांच्या जमिनीचा साठेखत दस्त बारामती दुय्यम निबंधक कार्यालयात फेब्रुवारी २०२४ मध्ये करण्यात आला आहे. त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन पाहिले असताना त्यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीचे बिगर ताब्याचे साठे खत दस्त नोंदविण्यात आला होता.
त्यावर लिहून देणार बाळासाहेब रामचंद्र निंबाळकर असे त्यांचेच नाव होते. त्याला त्यांच्याच नावाचे आधार कार्ड जोडले होते. लिहून घेणार नितीन पंढरीनाथ दांगट यांचे नाव असून साक्षीदार म्हणून अशोक केरभाऊ भोरडे, दादाा जाधव, हे असल्याचे दिसून आले. त्यांनी कधीही शेमजमिनीचा कोणालाही कसलाही दस्त करुन दिलेला नाही. असे असताना त्यांची शेतजमीन बळकाविण्यासाठी त्यांच्या नावाने तोतया व्यक्ती उभी करुन बिगर ताबा साठे खत करुन फसवणूक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक गजानन चेके तपास करीत आहेत.