
बारामती एमआयडीसी परिसरात कटफळ येथे लहान अवजारे बनवणाऱ्या उद्योजकाला आपण डॉन असल्याचे सांगत वारंवार धमकावणाऱ्या गुंडांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. निरज रॉय असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार,कटफळ (ता.बारामती) येथील अवजारे बनवणाऱ्या उद्योजकाकडून डॉन असल्याचे सांगून वारंवार धमक्या देत ८५ हजार रुपये वसूल केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांत फिर्याद दाखल आहे.

फिर्यादी हे बारामती एमआयडीसी येथे अवजारे बनवणारी कंपनी चालवतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ऑक्टोबर २०२४ पासून निरज रॉय, शुभम मोरे व भूषण रणसिंगे या तिघांनी स्वतःला ‘बारामतीचे डॉन’ असल्याचे सांगत त्यांच्याकडून ऑनलाईन व रोख स्वरूपात वेळोवेळी पैसे घेतले. हे आरोपी तक्रारदार यांना बारामतीतील विविध हॉटेलमध्ये भेटून दारूचे बिल भरण्यास भाग पाडत होते.

एप्रिल २०२५ पासून आरोपींनी ‘तुला कंपनी चालवायची असेल तर महिन्याला पैसे द्यावे लागतील, नाहीतर तुला बारामतीत राहू देणार नाही’ अशा धमक्या दिल्या. त्यानंतर कधी ४ हजार, कधी १० हजार रुपये अशा हप्त्यांमध्ये पैसे वसूल करण्यात आले. ऑक्टोबर २०२५ मध्ये पेन्सिल चौक येथे थांबवून ‘दारूचे बिल भर नाहीतर हातपाय मोडीन’ अशी धमकी देत फिर्यादीस मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. याच महिन्यात वंजारवाडीजवळ आरोपींनी त्यांच्याकडून २० हजार रुपये ऑनलाईन मागवले व धमकीखाली त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचेही फिर्यादीने सांगितले आहे.


