
‘आम्ही इथले भाई, दुकान बंद करून टाक’ म्हणत दुकानदाराला मारहाण
टोळक्याकडून दुकानाची तोडफोड, धुडगूस घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, अल्पवयीन आरोपी धोक्याचे?
पुणे – औंध परिसरात दहशत माजवण्यासाठी टोळक्याने सरळ दुकानात घुसून दुकानमालकाला मारहाण केली आणि तोडफोड केली. ‘आम्ही इथले भाई, दुकान बंद करुन टाक’ असे म्हणत टोळक्याने हल्ला केला आहे.
ही घटना रात्री घडली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण झालेल्या दुकानमालकाचे नाव गोपाल राव असे आहे. हल्लेखोरांनी दुकानमालकाच्या नाक, गाल आणि छातीवर जबर मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी चतुरश्रृंगी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एवढेच नाही तर, यासोबतच मोबाईल शॉपीच्या बाहेरची काच फोडून दहशतीचं वातावरण निर्माण करण्यात आले. तर या दहशतीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या एका व्यक्तीची सफारी गाडी फोडण्यात आली आहे. या घटनेनंतर चतुरश्रृंगी पोलिसांकडून चार आरोपींचा शोध सुरु आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल. असे चतुरश्रृंगी पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. औंधसारख्या व्यस्त आणि नागरी भागात कोयता गैंग इतक्या बेधडकपणे दहशत निर्माण करत असेल, तर पोलिस प्रशासन काय करतंय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चतुरश्रृंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा लवकरच शोध लावून त्यांना अटक करण्यात येईल. तसेच स्थानिक नागरिकांकडून या भागात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. पण या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.