
सुंदर तरुणी आधी मैत्री करून जवळीक वाढवायची आणि मग मात्र…
तरुणीने ८५० श्रीमंतांना घातला कोट्यवधीचा गंडा, राजकारणीही अडकले, इंटिरिअर डिझायनर तरूणीला अटक
मुंबई – छत्तीसगडमधील रायपूर येथे ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले असून पोलिसांनी मुंबईतून एका तरुणीला अटक केली आहे. नव्या मलिक असे तिचे नाव असून ती व्यवसायाने इंटिरियर आणि फॅशन डिझायनर आहे. ती नाइट पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवणाऱ्या टोळीशी संबंधित असल्याचा आरोप आहे. तिच्या फोनमध्ये ३६ जणांसोबत केलेले चॅटिंगही उघड झाले आहे.
मुंबई, पंजाब आणि हरियाणातील मोठ्या ड्रग्स तस्करांशी नव्याचे संबंध होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या मलिक व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहे. ती फॅशन डिझायनिंगसुद्धा करते. फॅशन शो आणि नाइट पार्ट्यांमध्ये ती नेहमी जात असे. याच दरम्यान तिला ड्रग्सची सवय लागली. नशेच्या आहारी गेल्यामुळे ती मोठ्या तस्करांच्या संपर्कात आली. नंतर तिने पैसे कमवण्यासाठी स्वतःच ड्रग्ज तस्करी सुरु केली. नव्याचे टार्गेट हे मुख्यत्वे विद्यापीठ आणि कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी होत्या. पोलिसांनी आरोपींकडून एमडीएमए, एक कार, ८५ हजार रुपयांची रोख, वजन मशीन, पाच मोबाईल फोन असा एकूण २० लाख रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. नव्या मलिक हॉटेल, पब आणि क्लबमध्ये येणाऱ्या धनिकांशी मैत्री करायची. त्यानंतर त्यांना अंमली पदार्थांचं सेवन करण्यास भाग पाडायची. नव्या मलिकच्या मोबाईलमध्ये अनेक श्रीमंत तरुणांचे नंबर मिळाले आहेत. आमदार, माजी मंत्र्यांच्या लेकांचे नंबर नव्याच्या मोबाईलमध्ये सापडले आहेत. यासोबतच मद्य व्यावसायिकांसह अनेक बड्या लोकांचे नंबरदेखील नव्याच्या मोबाईलमध्ये आढळून आले आहेत. सध्या तरी पोलिसांनी यातील कोणालाही अटक केलेली नाही. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या हर्ष आहुजानं पोलीस चौकशीत महत्त्वाची माहिती दिली आहे.
ड्रग्ज रॅकेटच्या मागे मुंबई, दिल्ली आणि पंजाबमधील मोठे माफिया आहेत, असं हर्ष आहुजानं पोलिसांना चौकशीत सांगितले आहे. हर्षच्या कबुली जबाबामुळे संपूर्ण सिंडिकेटची माहिती समोर आली आहे. सध्याच्या घडीला पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरु आहे.