गेल्या काही दिवसांत पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या विविध घटना घडल्याचं पहायला मिळत आहे. वाढत्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना टाळण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत होती.त्याच दरम्यान आता पुणे पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांचा थेट परवानाच रद्द करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आतापर्यंत दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर खटले चालवून दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. पण आता थेट लायसन्स रद्द करण्यात येणार आहे.
पहिल्यांदा ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये आढळून आल्यास संबंधित व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात येणार आहे. पण याच व्यक्तीने पुन्हा असाच गुन्हा केला तर पुन्हा परवाना रद्द करण्यात येईल. मात्र, दुसऱ्यांदा सहा महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात येणार आहे. तसेच तिसऱ्यांदा पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह केसमध्ये आढळून आल्यास ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरुपी रद्द केले जाणार आहे. या संदर्भातील माहिती पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.पुण्यात गेल्या सहा महिन्यांत 1648 जणांवर ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस झाल्या आहेत. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच खटले चालवून योग्य ती कारवाई संबंधित व्यक्तींवर सुरू आहे.
पुण्यात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना तेथील अमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामे बुलडोझर लावून नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे शहरामध्ये या संदर्भात व्यापक कारवाया करण्यात आल्या. आता तशाच पद्धतीने ठाणे शहर आणि मीरा-भाईंदर शहरातील अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामे ही बुलडोझर लावून नष्ट करण्यात येत आहेत.अमली पदार्थामुळे तरुणाईचे मोठे नुकसान होत आहे. हा विळखा तातडीने रोखणे महत्त्वाचे आहे. यासाठी अत्यंत कडक उपाय योजण्यात यावेत. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरु करावी. शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.