बाबा सिद्धिकी हत्याप्रकरणी मोठी माहिती समोर ! खून प्रकरणाचे आता पुणे कनेक्शन आले पुढे, मुंबई पोलिसांची प्रविण लोणकरला अटक
बाबा सिद्धिकी हत्याप्रकरणात आता पुणे कनेक्शन पुढे आले असून शुभम लोणकरचा २८ वर्षाचा भाऊ प्रविण लोणकर याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
वारजे येथे प्रवीण लोणकर हा डेअरी चालवत होता. या डेअरीमध्येच बाबा सिद्धिकी हत्यातील आरोपींचे काही काळ वास्तव होते. शिवानंदन ऊर्फ शिवा हा काही महिन्यांपूर्वी भंगार मालाच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचा. लोणकर याच्या डेअरी शेजारीच हे भंगाराचे दुकान आहे. त्याच्या जोडीला धर्मराज कश्यप हाही होता. शुभम लोणकर याने लॉरेन्स बिश्नोई टोळीला हत्यारे पुरविल्याबद्दल त्याला फेबुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. शुभम लोणकर याच्या सांगण्यावरुनच त्याच्या भावाने बाबा सिद्धिकीच्या हत्येत सहभागी असलेले धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांना पुण्यात आश्रय दिला होता. पुण्यात राहून त्यांचे अनेकदा मुंबईला येणे जाणे सुरु होते.
शुभम लोणकर याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचे जाहीर केले आहे.लॉरेन्स बिश्नोई टोळीशी कनेक्शन असल्याचा हा दुसरा प्रकार समोर आला आहे. यापूर्वी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्याप्रकरणात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील संतोष जाधव, जुन्नरमधील नवनाथ सूर्यवंशी आणि सिद्धेश कांबळे यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संपर्कात असल्यावरुन अटक करण्यात आली होती.