पुणे- राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. हत्येपासून फरार असलेला मुख्य आरोपी राहुल हंडोरेला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. तो मुंबईहून पुण्याला जात असताना त्याला अटक करण्यात आली. पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल दुपारी पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत.
दर्शना पवारचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. तिचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवातून स्पष्ट झाले होते. दर्शना मूळची नगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवड झाली होती.
२ जून रोजी सिंहगड किल्ल्यावर जात असल्याचं कुटुंबाला सांगितलं
पुण्यातील एका संस्थेकडून तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. ९ जून रोजी ती पुण्यात आली होती. नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे ती राहत होती. १२ जून रोजी सिंहगड किल्ल्यावर निघाली आहे, असे मैत्रिणीला सांगून ती बाहेर पडली. दर्शनाने कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली होती.
१२ जूननंतर दर्शनाचा मोबाइल बंद, कुटुंबाकडून बेपत्ता असल्याची तक्रार
किल्ल्यावर जाताना तिच्यासोबत मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे होता. १२ जूननंतर तिचा मोबाइल बंद झाला. तिच्या कुटुंबीयांनी संपर्क साधला. मात्र, तिचा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली.
दर्शनाचा मृतदेह सापडल्यानंतर राहुलचा शोध सुरू
दरम्यान, दर्शनाबरोबर असलेला मित्र राहुल हांडोरे बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे पोलिस ठाण्यात दिली. दर्शनाचा मृतदेह सापडल्यानंतर राहुलचा शोध सुरू होता. त्यानेच तिचा खून केल्याचा संशय पोलिसांना होता. लग्नाला नकार दिल्याने राहुलने तिचा खून केल्याची शक्यता आहे. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या राहुलला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.