
मोठी बातमी ! पुण्यात ईडीची मोठी कारवाई ;पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांची ८५ कोटींची मालमत्ता जप्त
पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांची ८५ कोटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली. बांदल यांची पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली. बेकायदा आर्थिक व्यवहार (मनी लॉड्रिंग) प्रकरणी मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडीतील निवासस्थानी ईडीने २१ ऑगस्ट रोजी छापे टाकले होते.
ईडीकडून बांदल यांच्या निवासस्थानातून कागदपत्रे जप्त केली. बांदल यांच्या बँक खात्यांची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. त्यानंतर बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली.बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. बांदल यांच्याविरुद्ध शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. बांदल यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली होती. मात्र, बांदल यांची गु्न्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन त्यांची उमदेवारी रद्द करण्यात आली होती.
पुणे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या नावांच्या वारंवार चर्चा केल्या जातात. पैलवान म्हणूनही त्यांची ओळख आहे. मंगलदास बांदल हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. ५० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी त्यांना २०२० मध्ये निलंबित करण्यात आले होते. शिरूर हवेलीच्या राजकारणातील एक महत्वाचा राजकीय चेहरा म्हणून बांदल यांची ओळख आहे. त्यांच्यावर वारंवार पक्षबदलाचे आरोप देखील केले जातात. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल या शिरूर-हवेलीमधून तयारी करीत असल्याची चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर बांदल यांच्यावर ‘ईडी’ची छापेमारी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.