इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आलेल्या हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत प्रवीण माने यांनी वेगळी चूल मांडली होती. हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयूर पाटील यांनी त्यांची साथ सोडली आहे. मयूर पाटील यांनी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा दिला आहे.
मयूर पाटील यांनी साथ सोडल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून इंदापूरातील राजकारण सातत्याने बदलत आहे. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर प्रवीण माने, भरत शहा आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी शरद पवार गटाची साथ सोडली होती. त्यानंतर आता मयूर पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडत परिवर्तन विकास आघाडीच्या प्रवीण माने यांना पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे आप्पासाहेब जगदाळे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी सभापती मयूर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत प्रवीण माने यांना पाठिंबा दिला. इतर उमेदवारांच्या तुलनेत प्रवीण माने यांना जनतेचा जास्त पाठिंबा आहे. आताचे उमेदवार मलिन प्रतिमेचे आहेत आणि लोकांना आता बदल हवा आहे. जनता आता आजी माजी उमेदवार नको असं म्हणत आहे. जे विचार घेऊन मी काम करत होतो त्यांना तिलांजली देण्याचे काम आमच्या घरातल्या लोकांनी केले.
त्यामुळे तालुक्याची विल्हेवाट लागायला लागली आहे. सहकारी संस्था हुकूमशाही पद्धतीने चालवण्यात आल्या. आम्ही काम करत होतो तेव्हा वरुन आदेश आल्याशिवाय काही होत नव्हतं. त्यांनी मंत्रिपदाचा, आमदाराकीचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी करणं आवश्यक होतं. पण तसं चित्र दिसलं नाही, अशी टीका मयूर पाटील यांनी केली.दरम्यान, इंदापूरची विधानसभा निवडणूक हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यात होईल असं सुरुवातीपासून वाटत होतं. प्रवीण माने यांच्या बंडखोरीने ट्विस्ट आला. गेल्या निवडणुकीत प्रवीण माने हे दत्ता भरणेंसोबत होते. त्यानंतर आता अपक्ष उमेदवारी दाखल करत प्रवीण माने यांनी सर्वांना धक्का दिला आहे.