
लग्न जवळ आले असतानाच जन्मदात्या बापाने केली मुलीची हत्या
वडिलांना अटक, मुलीचा दोन दिवसापुर्वीचा व्हिडिओ व्हायरल, व्हिडीओत मोठा खुलासा
भोपाळ – पोटच्या लेकीचा विवाह अवघ्या चार दिवसांवर आला असतानाच बापानेच मुलीची गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी बापाला अटक केली आहे.
तनु गुर्जर असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. वडील महेश गुर्जर याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलीचे लग्न दोन दिवसावर आले होते. पण त्याचवेळी ही हत्या करण्यात आली आहे. मुलीचा दोन दिवसापुर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यात तिने भीती व्यक्त केली होती. ती व्हिडीओत म्हणत आहे की, माझे नाव तनु गुर्जर आहे, माझ्या वडिलांचे नाव महेश गुर्जर आहे, माझ्या आईचे नाव ममता गुर्जर आहे. मी आदर्श नगरची रहिवासी आहे. मला तुम्हाला सांगायचे आहे की माझे एका मुलावर खूप प्रेम आहे. आमच्या नात्याला सहा वर्षे झाली आहेत. सुरुवातीला माझ्या घरच्यांनी लग्नाला होकार दिला होता, पण नंतर त्यांनी नकार दिला. आता ते मला रोज मारतात. तसेच जीवे मारण्याची धमकी देतात. मला प्रिय असलेल्या व्यक्तीचे नाव भिकम मावई आहे. तो आग्रा येथील रहिवासी आहे. माझा मृत्यू झाला किंवा मला काही झाले तर त्याला माझे कुटुंबीय जबाबदार असतील. कारण ते माझ्यावर रोज दुसऱ्याशी लग्न करण्यासाठी दबाव आणतात, पण मी करू शकत नाही. मुलीने लग्नाला नकार दिल्यामुळेच वडिलांनी तनुच्या तोंडावर पिस्तुलाने गोळी झाडून हत्या केली.
घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. तात्काळ सीएसपी महाराजपूर नागेंद्र सिंग सिकरवार घटनास्थळी पोहोचले तेव्हा महेश आपले पिस्तूल घेऊन शांत बसला होता. तनुला लग्न करायचं नव्हते. तिच्या संमतीशिवाय हे लग्न ठरले होते. यावरून हा संपूर्ण वाद झाला आहे.