
पुराची पाहणी करण्यासाठी गेलेल्या भाजप खासदार आणि आमदारावर हल्ला
हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल, खासदाराला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, आमदारही जखमी, कोणत्या कारणामुळे झाला हल्ला
कोलकत्ता – मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे काही भागाला पुराचा तडाखा बसला आहे. याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या भाजप खासदार आणि आमदारावर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
उत्तर बंगालमध्ये पावसामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. भूस्खलन आणि पुरामुळे अनेकांचा मृत्यू झालाय. नागराकाटा परिसरात अनेक भागात बचावकार्य सुरू असून याची पाहणी करण्यासाठी खासदार खगेन मुर्मू आणि आमदार शंकर घोष गेले होते. ते पूरग्रस्त भागाचा दौरा आटोपून परत निघत होते. त्यावेळी जमावाने त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात दोन्ही नेत्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. तर दगड लागल्यानं खासदार खगेन मुर्मू यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर शंकर घोष यांच्या तोडांवर जखम झाली आहे. ही घटना उत्तर बंगालमधील मालदा येथील नागरकाटा येथे घडली. भाजप खासदार खगेन मुर्मू यांचा ताफा तेथून जात असताना एका जमावाने त्यांच्यावर दगड, चप्पल, बूट आणि काठ्यांनी हल्ला झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सिलीगुडीचे आमदार डॉ. शंकर घोष आणि मालदा उत्तरचे खासदार खगेन मुर्मू पूरग्रस्तांना मदतसामग्री वाटण्यासाठी पोहोचले होते. यावेळी काही लोक चिडले आणि त्यांनी वाद घालण्यास, शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आमदार आणि खासदार यांच्या अंगरक्षकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, पण जमावाने दगडफेक सुरू केली. एक दगड मुर्मू यांच्या डोक्याला लागला, ज्यात ते गंभीर जखमी झाले. भाजप आमदार शंकर घोष यांनी या हल्ल्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाला जबाबदार धरले आहे. शंकर घोष म्हणाले की, हा हल्ला तृणमूल काँग्रेसने जाणूनबुजून केलेला कट आहे. तर तृणमूल काँग्रेसनं जनतेचा हा रोष असून स्थानिकांच्या संतापामुळे ही घटना घडल्याचं म्हटलं. आपत्ती ओढावली असताना बचावकार्य वेळेत सुरू झालं नाही यामुळे लोकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं असं सांगण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी अधिकचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.
खगेन मुर्मू हे मालदाह उत्तर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यापूर्वी ते २००६ ते २०१९ पर्यंत हबीबपूर मतदारसंघाचे आमदार होते. मूळ सीपीआय(एम) चे सदस्य असलेले मुर्मू २०१९ मध्ये भाजपमध्ये सामील झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे तेथील वातावरण तापले आहे.