
धक्कादायक! हळदीच्या कार्यक्रमात डान्स करत असताना नवरीचा मृत्यू
डान्सचा व्हिडिओ व्हायरल, आनंदाच्या वातावरणाला दु:खाचे गालबोट, पालखीएैवजी निघाली दीक्षाची अंतयात्रा
बदायू- आजकाल अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कल्पना नसतानाही अनेक तरूण देखील मृत्यूमुखी पडले आहेत. पण उत्तर प्रदेशमधील बदायू जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हळदीचा दिवशी डान्स करताना नवरीचा अचानक मृत्यू झाला आहे.
दीक्षा सिंह असे तरुणीचे नाव आहे. उत्तरप्रदेशातील बदायूंमध्ये दीक्षा नावाची तरुणी राहत होती. तिचे लग्न ५ मे रोजी होणार होते. यासाठीची सगळी तयारी झाली होती. विवाहसोहळ्यासाठी कुटुंबातील सगळी मंडळी जमली होती. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. लग्न असल्यामुळे ४ तारखेला हळदीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यामुळे सर्वजण डान्स करत होते. दिक्षा देखील डान्स करत होती. पण अचानक तिची तब्येत बिघडली. सर्वांना वाटले की दिवसभराचा थकवा आणि डान्समुळे तसे होत असावे म्हणून सगळ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दिक्षाने देखील त्याबद्दल काही सांगितले नाही. त्यानंतर ती शौचालयसाठी गेली. तिथेच तिला हृदयविकाराचा झटका आला. बराच वेळ होऊनही ती बाहेर न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा ठोठावला; पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. जेव्हा त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा ती बेशुद्ध पडली होती. तिला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले पण, डॉक्टरांनी तिला जागीच मृत घोषित केले. दीक्षाचे लग्न सोमवारी मुरादाबाद जिल्ह्यातील शिवपुरी गावातील रहिवासी सौरभशी होणार होते, जो एका स्थानिक कारखान्यात काम करतो. त्याच दिवशी नवरदेवाची वरात मुरादाबादहून येणार होती, पण घरातून नवरीची पालखी निघण्यापूर्वीच अंतयात्रा काढावी लागल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. सध्या नवरीचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, पण तो क्षणच तिच्या आयुष्यातील शेवटचा असेल असे कोणी कल्पना सुद्धा केली नव्हती.
या घटनेनंतर दीक्षाच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल करण्यास आणि तिचे शवविच्छेदन करण्यासही नकार दिला आहे. आनंदाच्या क्षणी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.