
मग्रुरी दाखवणाऱ्या मनोरमा खेडकर विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल
चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर सोडले कुत्रे, गुन्हा करूनही मग्रुरी कायम, नेमके कोणाचे केले अपहरण?
पुणे – नवी मुंबईत एका ट्रकच्या चालकासोबत असणार्या साहाय्यकाच्या (क्लिनर) अपहरण प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मनोरमा खेडकर या प्रशिक्षणार्थी माजी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आहेत. त्या नेहमीच वादग्रस्त राहिल्या आहेत. पण अजूनही त्यांची मग्रुरी कायम आहे.
पूजा खेडकर या अगोदर बनावट अपंग प्रमाणपत्र आणि प्रशिक्षणार्थी असताना केलेल्या प्रतापामुळे निलंबीत झाली आहे. तर बंदूक घेत गावकऱ्यांना धमकी दिल्या प्रकरणी तिची आई मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल आहे. आता हे खेडकर कुटुंबीय पुन्हा वादात अडकले आहे. मनोरमा खेडकर विरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नवी मुंबईतील रस्त्यावर ट्रक आणि चारचाकी गाडीचा अपघात होण्याच्या घटनेवरून हे प्रकरण समोर आले. ट्रकने घासलेल्या चारचाकी गाडीतील २ अज्ञात व्यक्तींनी संबंधित ट्रकचालकाचा साहाय्यक प्रल्हाद कुमार यांचे अपहरण केल्याची तक्रार संबंधित ट्रकचालकाने पोलिसांकडे केली होती. तक्रार प्रविष्ट केल्यानंतर तांत्रिक पडताळणीतून ती चारचाकी गाडी पुणे येथे मनोरमा खेडकर यांच्या घरी असल्याचे निदर्शनास आले. पोलीस पथकाने खेडकर यांच्या घरात जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना अडवले. पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडून पती दिलीप खेडकर यांना पळून जाण्यास साहाय्य केले. यावरून दिलीप खेडकर यांना सहआरोपी करण्यात आले असून मनोरमा खेडकर यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पण पुन्हा पोलीस त्याठिकाणी गेले असता ती पसार झाली होती. पोलिसांनी सुमारे सव्वा दोन तास खेडकर यांच्या बंगल्यावर थांबून संपूर्ण परिसराची झडती घेतली आहे. पोलिसांनी घरातून पूजा खेडकरचा एक जुना मोबाईल ताब्यात घेतला आहे. दिलीप आणि मनोरमा खेडकर यांनी त्यांचे फोन पुण्यातील बंगल्यात ठेऊन गायब झाले आहेत.
रबाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बलकृष्ण सावंत यांनी सांगितले, “खेडकर यांच्या आईने तपासात सहकार्य केले नाही आणि अधिकृत कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना चौकशीसाठी रबाळे पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.” खेडकर आणि अज्ञात आरोपी यांच्यातील संबंधाबद्दल पोलिसांनी अजून माहिती दिलेली नाही.