
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याबाबत रुपाली ठोंबरे पाटील यांनी सातत्याने टीका केली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने रुपाली ठोंबरे पाटील यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यानंतर पक्षाने नोटीस बजावली नसून खुलासा पत्र दिल्याची सारवा सारव रुपाली पाटील यांनी केली होती. मात्र ठोंबरे पाटील यांचा खुलासा येण्यापूर्वीच राष्ट्रवादीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. राष्ट्रवादीने त्यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली आहे.

राष्ट्रवादीने आज नव्या 17 प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन प्रवक्त्यांच्या यादीमध्ये रुपाली ठोंबर यांना स्थान देण्यात आले नाही. अमोल मिटकरी यांना देखील प्रवक्तेपदाची पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. आधीच्या प्रवक्तेपदाच्या सर्व नियुक्त्या रद्द केल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीने अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे, सायली दळवी, रुपाली चाकणकर, आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे, प्रशांत पवार, शशिकांत तरंगे, ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, सुरज चव्हाण, विकास पासलकर आणि श्याम सनेर यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान, रूपाली पाटील आणि चाकणकर या दोघी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गटाच्या) महिला पदाधिकारी असून, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या दरम्यान वाद सुरू आहे. फलटण येथे महिला डॉक्टरच्या मृत्यूच्या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी चाकणकर यांच्यावर टीका केली होती.


