अखेर काँग्रेसला मिळणार या दिवशी नवीन राष्ट्रीय अध्यक्ष
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी या नेत्याच्या नावाची चर्चा
दिल्ली दि २८ (प्रतिनिधी)- नाही होय आज उद्या म्हणत का होईना पण काँग्रेस अध्यक्षपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम अखेर ठरला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच आज बैठक झाली. यावेळी अध्यक्षपदासाठीच्या निवडणूक कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे काँग्रेसला लवकरच नवा अध्यक्ष मिळणार आहे. अध्यक्षपदासाठी गांधी घराण्याशी निष्ठावंत असणाऱ्यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला मतदान होईल तर १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना २२ सप्टेंबर रोजी जारी केली जाईल. अध्यक्षपदासाठी २४ ते ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीत नवीन अध्यक्ष निवड आणि निवडणूक तारखांवर चर्चा झाली. आरोग्य तपासणीसाठी सोनिया गांधी सध्या विदेश दौर्यावर आहेत. त्यांच्याबरोबर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आहेत. सोनिया गांधी यांनी व्हर्चुअल रुपात या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यांच्या मान्यतेनंतर निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.२०१९ लोकसभा निवडणुकीत सलग दुसर्यांदा पराभवला सामोरे जावे लागल्याने राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेंव्हापासून काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ सदस्य मिळालेला नाही. सोनिया गांधीकडे तीन वर्षापासून हंगामी अध्यक्षपद आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेते हरीश रावत यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांनीच अध्यक्ष व्हावे, अशी मागणी केली आहे. मात्र राहुल गांधी यांनी याला नकार दिला आहे. त्यामुळे राहुल आणि सोनिया गांधीच्या विश्वासातील व्यक्तीचीच निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.