
राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशोक खरातने केलेले महिलांचे लैगिंक शोषण, आर्थिक फसवणुकीनंतर आता आणखी एक बाब समोर आली आहे. भोंदूगिरीच्या जोरावर अनेकांना लुटणाऱ्या अशोक खरातच्या प्रकरणाने आता थेट प्रशासकीय वर्तुळाचे वाभाडे काढले आहेत.

प्रकरणाचा तपास करणाऱ्या ‘SIT’च्या हाती अशा काही धक्कादायक गोष्टी लागल्या आहेत, ज्यामुळे नाशिकमधील एका तत्कालीन महिला अधिकाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

भोंदू अशोक खरात प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक वळण समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या हाती महत्त्वपूर्ण पुरावे लागले आहेत. नाशिकमध्ये कार्यरत असलेली एक तत्कालीन महिला अधिकारी आता पोलिसांच्या रडारवर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या महिला अधिकाऱ्याने खरातला प्रशासकीय पातळीवर मदत केली होती, ज्याचे धागेदोरे आता एसआयटीच्या हाती लागले आहेत.

अशोक खरात याने भोंदूगिरीच्या जोरावर अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले होते. मात्र, त्याचा हा डोलारा केवळ अंधश्रद्धेवर नाही, तर प्रशासकीय आशीर्वादावर उभा होता, हे आता स्पष्ट होत आहे. नाशिकमध्ये पोस्टिंग असताना या संबंधित महिला अधिकाऱ्याने खरातला विविध कामांत मदत केली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या मदतीच्या बदल्यात खरातने आपले राजकीय आणि प्रशासकीय नेटवर्क वापरून या महिला अधिकाऱ्याला तिच्या पसंतीची पोस्टिंग मिळवून दिल्याची चर्चा आहे.
केवळ पोस्टिंगच नाही, तर खरात आणि या महिला अधिकाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याची माहितीही समोर येत आहे. SIT कडून सध्या या व्यवहारांच्या कागदपत्रांची आणि बँक डिटेल्सची पडताळणी करत आहे. सरकारी पदाचा गैरवापर करून एका भोंदूला पाठबळ देणे आणि त्याबदल्यात वैयक्तिक फायदे करून घेणे, या गंभीर आरोपांमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

