
भीक मागण्यासाठी बसण्यावरुन वाद ; रागाच्या भरात तेल वाहण्यासाठी ठेवलेला दगड डोक्यात घालून केले एकाला गंभीर जखमी
शनि मंदिराबाहेर भीक मागण्यासाठी बसण्यावरुन दोघांमध्ये भांडणे झाली. त्यात एकाने शनि मंदिरासमोर तेल वाहण्यासाठी ठेवलेला दगड डोक्यात घालून दुसर्याला बेशुद्ध केले.फरासखाना पोलिसांनी दिगंबर सिद्ध खांडेकर (वय ६१) याला अटक केली आहे.
या घटनेत जखमी झालेली व्यक्ती ५० ते ५५ वर्षांची असून ती अद्याप बेशुद्ध असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ही घटना बुधवारी सकाळी अकरा वाजता घडली.याबाबत पोलीस हवालदार मच्छिंद्र दादु खरात यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शनिवार वाड्यासमोरील शनि मंदिराबाहेर अनेक जण भीक मागण्यासाठी बसत असतात. दिगंबर खांडेकर आणि जखमी व्यक्ती यांच्यात जागेवर बसण्याच्या कारणावरुन वाद झाला. तेव्हा खांडेकर याने तुला आज सोडत नाही, खल्लासच करतो,असे म्हणून शिवीगाळ केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने शनि मंदिरासमोर तेल वाहण्यासाठी ठेवलेला दगडाने त्याच्या डोक्यात व तोंडांचे समोरील बाजूला मारुन गंभीर जखमी केले. या घटनेत ती व्यक्ती बेशुद्ध पडली. पोलिसांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक शेख तपास करीत आहेत