
पुण्यात सराईत गुन्हेगाराची अल्पवयीन मुलाला मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आरोपी या नेत्याचा पुतण्या
पुणे – पुण्यात एका नेत्याच्या पुतण्याने अल्पवयीन तरुणाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सराईत गुन्हेगार असणाऱ्या आरोपीने पुण्यात गहुंजे इथं लोढा सोसायटीत ही मारहाण केली आहे. याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.
आपल्या मुलासोबत वाद घातला म्हणून एका सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. किशोर भेगडे असे या आरोपीचे नाव आहे. किशोर भेगडे हा मावळ विधानसभेची निवडणूक लढलेल्या बापू भेगडे यांचा पुतण्या आहे. सोमवारी सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये किशोर भेगडेचा मुलगा आणि त्याचे मित्र खेळत होते. खेळता-खेळता अगदी क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. ही गोष्ट किशोर भेगडेला समजली. त्यानंतर त्याने मुलांच्या मित्रांना जाब विचारत मारहाण केली. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये भेगडे याने अल्पवीयन मुलाच्या पोटात मारत असल्याचे दिसत आहे. तसेच त्याने क्लब हाऊसमध्ये देखील आई वडिलांना बोलाव असा दाब देत मारहाण केली आहे. हा प्रकार सुरु असताना आजुबाजूचे लोक किशोर भेगडे याला थांबवण्याचा आणि मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. याप्रकरणी १५ वर्षीय मुलाच्या नातेवाईकांनी किशोर भेगडे याच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून किशोर भेगडे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दरम्यान पुण्यात गुन्हेगारीचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भेगडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. या घटनेमुळे सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.