Latest Marathi News
Ganesh J GIF

लाडकी बहीण योजनेसाठी बँकेत राडा ! बँक खात्याची कागदपत्रे पडताळणीवरुन बँक व्यवस्थापकाला मारहाण, तिघांना अटक

पुण्यातील हडपसर परिसरात लाडकी बहीण योजनेतील बँक खात्याची कागदपत्रे पडताळणीवरुन बँक व्यवस्थापकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना हडपसर परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या फुरसुंगी शाखेत घडली आहे. गोंधळ घालणाऱ्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

गणेश मधुकर होले, निखिल संजय मुळीक, अक्षय अनिल रासकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत बँक व्यवस्थापकांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश, निखिल, अक्षय हे घरपोहोच खाद्यपदार्थ पोहचविणाऱ्या खासगी कंपनीत कामाला आहेत. गणेशच्या पत्नीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता. तिचे बँक ऑफ महाराष्ट्राच्या फुरसुंगी शाखेत खाते आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्याची पडताळणी करण्याचे काम सुरु आहे. गणेश कागदपत्रे घेऊन बँक ऑफ महाराष्ट्राच्या फुरसुंगी शाखेत ५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गेला होता. त्यावेळी बँकेत प्रचंड गर्दी होती.

दरम्यान, खाते पडताळणी संदर्भातील कागदपत्रे तातडीने जमा करण्यात यावीत, असा आग्रह गणेशने धरला. बँकेत गर्दी असल्याने बँक व्यवस्थापकांनी त्याला रांगेत थांबण्यास सांगितले. या कारणावरुन त्याने बँक व्यवस्थापकांशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर गणेश बँकेतून बाहेर आला. त्याने साथीदार निखिल, अक्षय यांना बोलावून घेतले. बँकेत गोंधळ घालून त्यांनी शाखा व्यवस्थापकांना शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पसार झालेल्या तिघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव तपास अधिक तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!