
कामाचा पगार मागितल्याने दलित तरुणाला उद्योजकेची बेदम मारहाण
बेल्टने मारहाण करून शूज चाटायला लावले, सोशल मिडीयावर स्टार असलेल्या उद्योजकेचा प्रताप
मोरबी दि २५(प्रतिनिधी)- गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात एका दलित तरुणाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या उद्योजिका विभूती पटेल उर्फ राणी बा हिच्यावर दलित तरुणाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.त्यामुळे विभूती पटेल हीच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
निलेश किशोरभाई दलसानिया असं पीडीत तरुणाचे नाव आहे. नीलेशने या प्रकरणात पोलिसांना तक्रार दिली. विभूती पटेलने केवळ मारहाणच केली नाही तर बुट चाटण्यास देखील भाग पाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निलेश राणीबा इंडस्ट्रीजच्या निर्यात विभागात कार्यरत होते. १८ ऑक्टोबर रोजी विभूतीच्या कंपनीत काम करणाऱ्या निलेशला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. पण पगार होण्याच्या काळात त्याला पगार मिळाला नाही. त्यावेळी त्याला ऑफिसमध्ये येऊन पगार घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर तो विभूती यांच्याकडे १५ दिवसाचा पगार मागण्यासाठी गेला होता. यावेळी विभूती आणि तिच्या सहकाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. तसेच त्याला बुट चाटण्यास देखील भाग पाडले. दरम्यान मोरबी पोलिस ठाण्यात विभुती पटेलसह सहाजणांविरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितांच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे घटनेनंतर विभुती पटेल आणि तिचे साथीदार फरार झाले आहेत. पिडीत निलेशवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या व्हिडिओंमध्ये विभूती पटेल स्वत:ला लेडी डॉन असे म्हणवून घेते. तसेच इन्स्टाग्रामवरील फोटोमध्ये तिने स्वतःला राणीबा म्हणून जाहीर केले आहे. दरम्यान या घटनेबाबत राणीबा इंडस्ट्रीजकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.