
भिंतीवर डोके आपटत निर्दयी सुनेने केला सासूचा खून
सहा महिन्यापुर्वीच झाले होते लग्न, मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न, बुलेटवर पसार पण...
जालना – सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या सुनेने सासूची हत्या केल्यानंतर एका व्यक्तीच्या बुलेटवर बसून पसार झाल्याची घटना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीत घडली आहे. सुनेला आता अटक करण्यात आली आहे.
संगिता संजय शिनगारे असे मृत महिलेचे नाव आहे. प्रतिक्षा शिनगारे असे आरोपी सूनेचे नाव आहे. प्रतीक्षा हिचा विवाह सहा महिन्यापूर्वी आकाशसोबत झाला होता. शिनगारे कुटुंब हे मुळचे बीडचे आहे. लग्नानंतर जालना येथे राहण्यासाठी आले होते. आकाश हा लातूर येथे नोकरीला होता. तर सासू आणि सून दोघी जालन्यात भाड्याने राहत होत्या. त्यांच्यात नेहमी वाद होत असत, बुधवारी प्रतीक्षा ही रात्री पती आकाशशी फोनवर बोलत होती. यावेळी सासू सविताने मुलासोबत बोलण्यासाठी फोन मागितला. प्रतीक्षाने तो दिला नाही. यावरून दोघींमध्ये वाद झाला. त्यानंतर मध्यरात्रीनंतर पुन्हा दोघींमध्ये वाद सुरू झाला. यात प्रतीक्षा हिने सासूच्या डोक्यात जोरदार वार केला. या हल्ल्यात सविता यांचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर भिंतीवर रक्त उडाले होते. प्रतीक्षाने रक्ताचे डाग पुसण्याचा प्रयत्न केला. गोणीत भरलेला मृतदेह जिन्याच्या पायऱ्यांवर ठेवून प्रतीक्षा पहाटे घराबाहेर पडली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो एका पोत्यात भरला. मात्र, तो उचलता न आल्याने सून फरार झाली. घरमालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पचंनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शेजारी राहणाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपी सून एका अज्ञात व्यक्तीच्या बुलेटवर बसून पसार झाली. त्यानुसार पोलिस सून व बुलेटस्वाराचा शोध घेत आहेत. सूनेने आपल्या सासूला इतक्या निघृणपणे का संपवले? या हत्येत आणखी कोणाचा सहभाग होता का? असे अनेक सवाल उपस्थित होत असून यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करुन घरी आलेल्या सूनेने इतक्या भयंकरपणे सासूला संपवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रतीक्षा शिनगारे ही पहाटे साडेपाचच्या सुमारास घरातून बाहेर पडताना सीसीटीव्हीत कैद झाली. सासूचा खून केल्यानंतर प्रतीक्षाने थेट माहेर म्हणजे परभणी गाठले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे जाऊन दुपारी तिला अटक केली आहे.