
आईला सोबत घेत मुलींची वडिलांना बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट, पत्नीची ती मागणी ठरली कारण
भोपाळ – सध्या एक धक्कादायक घटना समोर येते आहे. दोन पोटच्या मुलींनी आपल्या वडिलांनाच मारहाण केली आहे. कमाल म्हणजे या कामात त्यांना आईनेही साथ दिली आहे. सध्या सोशल मिडियावर मुली आणि पत्नी वडिलांना मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मध्य प्रदेशच्या मुरैना येथे हरेंद्र मौर्य यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यांनी आत्महत्या केली असल्याचा दावा केला गेला. मात्र आता त्यांच्या मृत्यूपश्चात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात त्यांनी आत्महत्या नाही तर खून झाल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या धक्कादायक व्हिडिओमध्ये हरेंद्रची पत्नी त्याचे पाय धरून आहे आणि त्याच्या मुली त्याला काठीने मारहाण करत आहेत. तो वेदनेने ओरडताना दिसत आहे. एका क्षणी, त्याचा लहान मुलगा त्याच्या बहिणीला रोखण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती त्यालाही मारहाण करण्याची धमकी देते. हरेंद्रने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करूनही, त्याची पत्नी त्याला दाबून ठेवत राहते. हा व्हिडिओ हत्या होण्याच्या आधीचा आहे, त्यामुळे सगळीकडे संताप व्यक्त होत आहे. हरेंद्र यांचा मृत्यू झाल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, सततच्या भांडणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी. तर त्यांच्या पत्नीच्या आई-वडिलांनी हरेंद्रच्या वडील आणि भावावर खूनाचा आरोप केला. पोलिसांनी अंतिम अहवाल आल्यानंतरच ही आत्महत्या होती की हत्या? याबाबत निश्चित सांगता येईल, अशी माहिती दिली आहे.
हरेंद्र मौर्य हे इलेक्ट्रिशियनचे काम करत होते. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हरेंद्र आणि त्यांच्या पत्नीचे नेहमीच वाद होत असत. १ मार्च रोजी त्यांच्या दोन मुलींचे लग्न झाले होते. त्यानंतर पत्नीने हरेंद्रपासून वेगळे होण्याचे ठरवले होते. त्यामुळे हरेंद्रने निराश होऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले होते.