
पुण्यात गोळीबार आणि मारहाणीत जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू
पोलीसांनी आरोपींना केली अटक, रूग्णालयात नातेवाइकांचा आरोप, नेमके काय घडले?
पुणे – पुणे शहरात आणि पर्यायाने पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अगोदर कोयता गँगचा त्रास असताना आता गोळीबार करण्यापर्यंत आरोपींची मजल गेली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच थेऊरमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
किरकोळ वादातून तिघांनी त्यांच्याकडील परवाना नसलेल्या बंदुकीतुन गोळीबार केल्याची घटना थेऊर येथील जय मल्हार हॉटेलजवळ चार दिवसापूर्वी घडली होती. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी भानुदास शेलार, अजय मुंढे आणि सतीश उर्फ नाना मुंढे यांना अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी थेऊर येथील जय मल्हार हॉटेलच्या शेजारी असलेल्या मोकळ्या प्लॉटवर फॉर्च्युनर कार मधून उतरुन उघड्यावर लघवी करत थांबले होते. त्यावेळी तेथील वॉचमन अक्षय साहेबाराव चव्हाण याने ‘इथे लघवीला का थांबले, समोर माझी बायको आहे. तुम्हाला दिसत नही का?’ असा जाब विचारला. यावेळी आरोपी आणि चव्हाण यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे आरोपींनी अक्षय चव्हाण आणि त्यांची पत्नी शितल चव्हाण यांना दगड व हाताने मारहाण केली. त्यानंतर हवेत गोळीबार करुन ते केसनंदच्या दिशेने निघून गेले. यात शितल चव्हाण यांना दुखापत झाली होती. पोलिसांनी जखमी झालेल्या शीतल चव्हाण यांना तत्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. पण शितल चव्हाण यांची मृत्यूबरोबर सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. उपचारादरम्यान शितल चव्हाण यांचे निधन झाले. शितलचा मृत्यू हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून एक पिस्तूल व काही काडतुसे जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान नातेवाईकांची समजूत काढण्यास पोलिसांनी यश मिळवले आहे.